घराच्या फाटकाला हात लावताच त्या वरच्या धुळीने चटकन हातच धरला. ती चिमूट भर धुळ हाताला लागताच, अशाच धुळीत माखलेल्या कित्येक आठवणींनीच जणू स्पर्श केल्या सारखे वाटले. पण त्याच क्षणाला त्या फाटकावरच्या धुळी मागचा गंजलेला रंग दिसला आणि मन परत भानावर आले. आत पाऊल टाकताच अंगणातील सुकलेल्या पानांनी आणि चिमलेल्या फुलांनी माझे स्वागत केले. पण अंगणातील फुटक्या फरश्या जणू माझ्या कडे लपून शांतपणे एकटक बघत होत्या. आणि तितक्याच शांतपणे माझ्या कडे बघत होता तो झुला. तो सुद्धा तसाच.....गंजलेला!
समोर व्हरांडा आणि व्हरांड्याकडून थेट माझी पाऊले वळली आतल्या बैठकीकडे. बैठकीच्या भिंतींचा रंग जाळ्यांनी आणि त्यात असलेल्या किड्यांनी अगदी नाहीसा करून टाकला होता. एक पाऊल पुढे टाकताच माझी नजर उजवी कडच्या एका जुन्या सोफ्याकडे गेली. त्या काळ्या रंगाच्या सोफ्याचे दोन पाय तुटके आणि बाकीचे दोन तुटल्यागत झाले होते. डावीकडचा एक भला मोठा दिवाण मात्र जणू माझ्याकडे अनोळख्या नजरेने एकटक बघत होता. पण का कोण जाणे, काहीतरी वेगळेच वाटत होते, काहीतरी अपूर्ण. काहीतरी चुकल्यासारखे. काहीतरी माझे..हरवल्यासारखे.
हा विचार करत असतांनाच समोर नजर गेली आणि तो एक कोनाडा आणि त्या कोनाड्यात कॅसेट्स चा एक ढीग दिसला. "कित्येक आवाजांचा खजिना असेल तो." हा विचार करत असतांनाच माझी नजर बाजूला असलेल्या, लपून पण हसून माझ्या कडे बघत असलेल्या त्या रेडिओ कडे गेली. ओळखीच्या व्यक्तीने आपल्या कडे हसून पाहिले, पण आपल्याला त्याच्या नावासकट काहीही न आठवल्यावर जी स्थिती होते, अगदी तशीच त्या रेडिओ कडे बघताच माझी झाली. या सगळ्या गोष्टी ना, एका तुटक्या धाग्यासारख्या वाटत होत्या. असे धागे, जे मनाच्या विणलेल्या मुलायम कपड्यातून वेगळे झालेले आहेत. "इतके अनोळखी का वाटते आहे सगळे? निर्जीव, बेरंग. या आठवणी इतक्या पुसट आणि अस्वच्छ का आहेत? माझेच घर ना हे?"
या विचारात असतांनाच मी एक पाऊल पुढे टाकले आणि कशामुळे तरी माझे पाऊल थांबले. मी खाली वाकून पाहिले तेव्हा माझा पाय एका चष्म्याला लागला होता. तो चष्मा उचलून पहिला तर त्यावर धुळीचा एक चिमूट सुद्धा नव्हता. अगदी साधा पण मोठ्या भिंगाचा चष्मा होता तो. "हा..बहुतेक हा आजोबांचा चष्मा असावा. पण घरातील प्रत्येक गोष्ट धुळीने रंगलेली असतांना फक्त यावरच धूळ काशी नाही? यात काय वेगळे आहे?" असे म्हणून मी सहज तो चष्मा डोळ्यांवर चढवला आणि त्या क्षणा पासून माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.
तो चष्मा घातल्यावर माझ्या आजूबाजू चे सगळे दृश्य पूर्णपणे बदलून गेले होते. माझ्या आजूबाजूला बोलण्याचे, हसण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. सगळंच बदललं होतं. ती धुळीने आणि कचऱ्याने माखलेली फरशी आता , स्वछ आणि थंड आहे असे जाणवू लागले. पाली, झुरळ, जाळे यांच्या जागी भिंती आणि त्यांचा सुंदर रंग चमकू लागला. मला मात्र प्रचंड भीती वाटू लागली. "हा काय विचित्र प्रकार आहे. हे काय होते आहे हे?" असे म्हणून मी लगेच तो डोळ्यांवर चढवलेला चष्मा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हढ्यात...एक छोटीशी मुलगी माझ्या मागून धावत आली. तिचा चेहरा एका वेगळ्याच आनंदाने खुलला होता. एक चमकणारे तेज होते तिच्या डोळ्यात. माझ्या समोर ती जोरजोरात धापा टाकीत आणि तितक्याच जोरात हसत उभी होती. पण तिची नजर माझ्या कडे गेलीच नाही. मी तिला हाका मारू लागले पण माझा आवाज तिच्या पर्यंत पोहोचतच नव्हता. मला काही कळेनासेच झाले. इतक्यात माझ्या मागून अजून कोणीतरी पळत येण्याचा आवाज मला ऐकू आला. मागे वळून बघताच तिच्याहुन थोडा मोठा मुलगा तिला जणू पकडण्या साठी तिच्या मागोमाग पळू लागला. इतक्यात त्यांचा हा खेळ पाहून हसत हसत दोन आजी आजोबा त्या सोफ्यावरती येऊन बसले. "आरे किती गोंधळ करताय दोघं, आई ओरडेल आता तुम्हाला". "अगं, खेळू दे त्यांना, मुलं या वयात गोंधळ नाही घालणार तर कधी घालतील?" असे त्यांचे बोलणे सुरू होते.
आणि माझ्या मानात भीती आणि डोक्यात नुसता गोंधळ चालू होता. इतक्यात आतून आणखीन एक आवाज ऐकू आला "स्पृहा , विघ्नेश..उगाच मस्ती करून आजी आजोबांना त्रास देऊ नका, एक एक धपाटा खाल नाहीतर दोघेही."
हे एक वाक्य ऐकताच माझा श्वासच जणू थबकला. हृदयाने आपला वेग वाढवला आणि अंगांत विचित्र प्रकारचे तार वाजू लागले. माझे विश्व एका ठिकाणी थांबून गेले आणि मन याच विश्वात जणू हरवून गेले. माझ्या पोटात गोळे येऊ लागले आणि पायात त्राण न उरल्या सारखेच झाले. "ही छोटी मुलगी मी आहे? आणि हा माझा भाऊ आहे?..हा संपूर्ण परिवार माझा आहे? पण मला का नाही बर आठवत आहे हे सगळे? माझ्या स्मृती ला काय झाले आहे? आणि मला हे सगळे आत्ताच का दिसतात आहे? आणि त्यांना मी का नाही दिसत आहे" या गोंधळात मी अडकले असतांनाच...बाबा आतून मला आणि दादा ला हाका मारीत बाहेर आले आणि म्हणाले, "दादू आणि चिऊ, मी तुमच्या साठी एक गम्मत आणली आहे, पण तुम्ही गोंधळ करणार नसाल तरच तुम्हाला ती मिळेल". हे वाक्य उच्चारताच, आम्ही दोघेही शांत बसून राहिलो. तेव्हा लगेच बाबांनी आत जाऊन एक रेडिओ आणला. आणि त्या सोबतच काही कॅसेट्स देखील आणल्या. हे बघताच आम्ही आनंदाने अक्षरशः नाचू लागलो . आमचा हा आनंदाचा वर्षाव ऐकून आई पण आतून बाहेर बैठकीत आली. आजी आजोबा दोघेही आमचे गोंडस कुतूहल आणि त्यातला तो निखळ हर्ष बघून अतिशय सुखावले. आम्ही बाबांच्या अवतीभोवती फिरू लागलो आणि आमच्या या नवीन उत्साहात घरातील सर्व जण सामिल झाले.
हा सगळा आनंदाचा जल्लोष बघून काही क्षणांसाठी मी, या माझ्या सोबत घडणाऱ्या सगळ्या विचित्र प्रकारा बद्दल अगदी विसरून गेले. जणू या क्षणांमध्ये मी यांच्या या छोट्याश्या "पार्टी" चा एक अदृश्य भाग झाले होते. माझे मन यांच्या आपुलकी मध्ये रमून गेले होते. माझे मन यांच्या निरागस आनंदात विरघळून गेले होते. माझे मन यांच्यातल्या प्रेमात हरवून गेले होते. या जादुई चष्म्यामुळे मी नकळत माझ्याच भूतकाळात आले आहे आणि माझ्या जवळीची माणसं माझ्या समोर असून मला बघूच शकत नाही आहेत हा विचार माझ्या मनातून पार निघूनच गेला होता. खरे तर माझ्या समोर घडत असलेला तो क्षण फार छोटा आणि साधा होता. तरी देखील या एका क्षणात एक निराळे जग मला सापडले होते. दादाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यात मिसळलेली ती उत्सुकता, आम्हाला आनंदी बघून आई बाबांच्या डोळ्यातली ती आगळी वेगळी चमक, आजीचे ते मृदू हास्य आणि संपूर्ण परिवाराला एकत्र आनंदात पाहून आजोबांच्या चेहऱ्यावरचे ते समाधान. किती सुंदर होते हे यांचे जग!! हे जग या सगळ्यांना एकमेकांसोबत मिळणाऱ्या आनंदानेच माझ्या समोर आले होते. त्यांचेच जग होते ते...साधे पण आपुलकीचे. हे सगळे त्यांच्या या जगात रमलेले होत. पण एकत्र होते. मतभेद असतीलच त्यांच्यात . पण दुरावा नक्कीच नव्हता. तडजोडी असतील पण अबोला कधीच नव्हता हे नक्की. आणि या त्यांच्या जगाचा एक भक्कम पाया म्हणजे त्यांच्यातले नाते. फक्त रक्ताचे नाही तर प्रेमाचे.. जिवाभावाचे. घट्ट, स्वछ आणि सुरेख. आणि त्यांच्या या जगात फक्त तेच सामील नव्हते हे मला अगदी क्षणात लक्षात आले.
तो डावी कडचा दिवाण त्यांच्या या जल्लोषात जणू अगदी हरवून गेला होता. बाहेरचे फाटक धुळी ऐवजी जणू या घरातील लोकांचा एकत्रितपणा साजरे करीत होते. अंगणातील चिमलेली फुलं आणि पानं बागेत जणू यांच्या आनंदाचे गीत अगदी सुरात गात होते. त्या अंगणातील फरश्या तुटक नाही पण एकमेकांना धरून यांच्या नात्यासारखे घट्ट होत्या. परंतु त्या काळ्या रंगाच्या सोफयाचे आता सुद्धा दोन पाय तुटके आणि बाकी दोन तसेच होते. पण तरीही तो जणू खंबीर पणे यांच्या आनंदाला धरून उभा होता. आणि हे सगळे पाहत असतांना मी एक नजर स्वतः कडे नेली. स्वतःमधल्या त्या लहान, कोवळ्या आणि निरागस चेऱ्याकडे गेली. त्या नुकत्याच फुललेल्या मनाकडे गेली. पावसाचे आनंददायी तुषार अंगावर पडताच जशी ती एक नाजूक कळी हळुवारपणे उमलते , अगदी तशी होते मी. "माझ्या" जगात आणि "माझ्या" घरात रमून गेलेले. त्या नवीन आणलेल्या रेडिओ चे वेडे आणि अनोखे कुतूहल माझ्या हास्यात दिसत होते. त्या कॅसेट्स चे दणक्यात स्वागत करण्याचे वेध माझ्या डोळ्यात उभारून येत होते. मी स्वतः कडे एकटक बघत होते. ते मन छोटे होते पण ते मन सुंदर होते. ते मन सागळ्यांशी जुळलेले होते. सागळ्यांशी बांधलेले होते. अगदी अंगणातील फरश्या देखील त्या मनाशी बांधलेल्या होत्या. त्या मनाला ओळखीच्या होत्या. आणि या क्षणाला मला जाणवले की माझ्यातल्या त्या हरवलेल्या "स्पृहाला" मी अगदी विसरूनच गेले होते. आज मला इथे सगळे अनोळखी होते. ते अंगण, तो झुला, त्या फरश्या, तो दिवाण, सोफा, तो रेडिओ, मला दिसणारी माणसं आणि.....मी! सगळेच अनोळखी! पण आज मला तो धागा सापडला. जो माझ्या मनाच्या विणलेल्या मुलायम कपड्यातून अलगद वेगळा झाला होता. तो धागा मीच होते. हरवलेला. तुटलेला. पण त्या कापड्याचाच एक भाग...मी!
मी या विचारात मग्न होते आणि अचानक आजोबांनी इतरांना विचारले, "ए , कोणी माझा चष्मा पहिला का रे? किती शोधले पण सापडतच नाहीये.."